ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

उद्योगनगरीतील महिला कामगार उपेक्षितच !

पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून परिचित आहे. आज एकीकडे महिला आरक्षण, महिलांचे स्वतंत्र धोरण, महिलांचा मंदिर प्रवेश याविषयीच्या गप्पा झडत असताना शहरातील महिला कामगार मात्र उपेक्षिताचे जीणे जगत आहेत. महिला दिनानिमित्त त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत...

केंद्र सरकारच्या हिंदुस्थान अॅटिबायोटिक्स (एचए) या कारखान्याने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीची पायाभरणी झाली. 'एचए' नंतर या परिसरात अनेक कारखाने उभारले जाऊ लागले. कालांतराने टेल्को (टाटा मोटर्स), बजाज सारख्या कंपन्या याठिकाणी आल्या त्यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळाली. आज अखेरीस लहान-मोठ्या उद्योगांची संख्या सुमारे ५ हजार ५०० पर्यंत वाढली आहे. अलिकडच्या काळात हिंजवडी, तळवडे या ठिकाणी आयटी पार्क विकसित झाले. एमआयडीसी व आयटी पार्क परिसराबरोबरच पेट्रोल पंप, 'शॉपिंग मॉल्स' तसेच वीट भट्टीपासून ते बांधकाम मजूर म्हणूनही महिला कामगार मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. बँका, पतसंस्था, रुग्णालये, छोटी-मोठी दुकाने याठिकाणी महिला कर्मचारी वर्ग पहायला मिळतो.  मात्र, कामगार क्षेत्रातही पुरुषी मानसिकतेचे प्राबल्य अधिक असल्याने महिला कामगार हालाखीचे जीणे जगत आहेत. 

शहरातील हजारो औद्योगिक कारखान्यांमध्ये शेकडो कामगार संघटना कार्यरत आहेत. दुर्देवाने महिला कामगारांसाठी एकही स्वतंत्र कामगार संघटना नाही. विशेष बाब म्हणजे महिला कामगार कार्यरत असलेल्या ठिकाणी ज्या कामगार संघटना कार्यरत आहेत. त्याच्या कार्यकारिणीतही महिलांना स्थान नाही. परिणामी व्यथा मांडण्यासाठी महिलांना हक्काचे व्यासपीठ नाही. कामाच्या ठिकाणी महिलांना मोठ्या प्रमाणावर मानसिक, लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. मात्र, काम गमावण्याची भिती, बदनामी, दाद मागण्यासाठी हक्काची जागा नसल्याने महिला मूग गिळून अन्याय, अत्याचार सहन करतात. 

कारखान्याच्या व्यवस्थापनातही महिलांचा टक्का कमी आहे. त्यामुळे महिला कामगारांना दाद मागताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. वेतनकरार अथवा कामगारांसाठीचे धोरणात्मक निर्णय घेताना महिला कामगार प्रतिनिधींना विचारात घेतले जात नाही. संघटनेचे बळ पाठिशी असल्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला, कागद-काच-पत्रा गोळा करणाऱ्या महिलांना त्यांचे न्याय-हक्क मिळत आहेत. मात्र, औद्योगिक परिसरात व इतर खासगी अस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिला त्यापासून कोसो दूर आहेत. राजकारणात महिलांना आरक्षण मिळाले तरी खासगी क्षेत्रात, नोकरीच्या ठिकाणी महिलांचा संघर्ष कायम आहे. 

महिला पुरुषांच्या बरोबरीत काम करत असल्या तरी त्यांना समान वेतन मिळत नाही. विशेष म्हणजे महिलांना कंत्राटी पध्दतीने राबवून घेतले जाते. सणवार, गरोदरपणातील रजा, कौटुंबिक जबाबदारीमुळे महिलांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचा अजब निष्कर्ष उद्योजक व व्यवस्थापनाने काढलेला आहे. त्यामुळे महिलांना कामावर कायम करुन घेण्यात टाळाटाळ केली जाते. भोसरी औद्योगिक परिसरातील काही कारखान्यांमध्ये तर अविवाहित महिलांनाच कामावर घेण्याची अट आजही घातली जाते. लग्न अथवा बाळंतपणाच्या सुट्टीवर जायचे म्हटल्यास महिलांना कायमस्वरुपी नोकरी सोडावी लागते. अश्या सुट्ट्यांचा मोबदलाही मिळत नाही. पेट्रोल पंप, दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांना आठ तासाहून अधिक काळ काम करावे लागते. मात्र, त्याचा कोणताही मोबदला मिळत नाही. विविध कारखान्यांमध्ये कामगारांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, महिला कामगारांसाठीही काही स्वतंत्र उपक्रम राबविणे गरजेचे आहे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडून कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलांना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत. मात्र, त्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ न देता समाजभावनेतून  त्यांचा विचार झाला तरच महिला दिन खऱ्या सार्थकी लागेल. 

सुरक्षिततेचे 'तीन तेरा'
महिला कामगारांच्या सुरक्षिततेचे सर्वच ठिकाणी 'तीन तेरा' झाले आहेत. महिला सुरक्षेची जबाबदारी झटकण्यासाठी महिलांना 'ओव्हर टाईम'मध्येही काम करु दिले जात नाही. त्यामुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी 'ओव्हर टाईम'च्या माध्यमातून काम करण्याची इच्छा असतानाही त्यांना काम मिळत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक उत्पन्नावरही होत आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर सरकारी, खासगी आस्थापनांना सक्तीच्या करण्यात आलेल्या विशाखा सारख्या कमिट्यांनाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील रुग्णालयात परिचारिकेवर बलात्काराचा प्रकार घडला होता. महापालिकेसह शहरातील अन्य खासगी रुग्णालयांमध्येही रात्र पाळीत काम करणाऱ्या परिचारिका तसेच महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आहे. 

महिला कामगारांना काय हवेय?
> समान काम, समान दाम
> महिला कामगार पाल्यासाठी पाळणाघर 
> सुरक्षित वातावरणात काम करण्याची संधी
> कामाच्या ठिकाणी तक्रारीसाठी व्यासपीठ
> पगारी बाळंतपण रजा
> स्वतंत्र स्वच्छतागृह 
> सुरक्षित चेंजिंग रुम
> कायमस्वरुपी कामाची हमी
> महिला कामगारांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र 'हेल्पलाईन'