ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोठे व्हायचे असेल तर वेळेची किंमत ओळखा - डॉ. मेहंदळे


पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) - या महाराष्ट्रात सह्याद्रीचे प्रचंड कडे आहेत; तशीच त्या कड्यांसारखी उत्तुंग माणसेही आहेत, फक्त त्यांना ओळखायला शिकले पाहिजे. ज्याला सामाजिक कार्य करायचे आहे, त्याने चारित्र्य जपले पाहिजे, असा कानमंत्र येष्ठ माध्यम विश्लेषक आणि निवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी चिंचवड येथे युवकांना दिला.  आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर वेळेची किंमत ओळखली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिर प्रांगणात स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय सिद्धिविनायक वार्षिक व्याख्यानमालेचा समारोप डॉ. मेहंदळे यांनी मला भेटलेली माणसे या विषयाने केला. जलतज्ज्ञ अनिल पाटील, दिलीप सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ मस्के, सचिव राजेंद्र घावटे, उपाध्यक्ष अनिल गोडसे, कोषाध्यक्ष संपत बोत्रे, कवी प्रदीप गांधलीकर, वर्षा बालगोपाल आदी उपस्थित होते.

डॉ. विश्वास मेहेंदळे म्हणाले की, बालपणापासून पुण्यात मला आंतरराष्ट्रीय कीर्तीची अनेक माणसे अनुभवता आली; त्यांनी माझे आयुष्य समृद्ध केले. गरिबीमुळे आई श्रीमंतांकडे स्वयंपाकाची कामे करीत असे; आणि मी दोन रुपये महिना पगारावर बालपणी त्या श्रीमंतांकडे देवपूजा करीत असे. जगात देव खरोखर आहे का ? असा प्रश्न त्या अजाणत्या वयातच पडला. दारिद्रय हा शाप नाही; तर आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने त्यावर मात करता येते, ही शिकवण देखील मिळाली. श्रीमंत माणसे खोटे बोलतात; पण समाज त्यांच्यावरच विश्वास ठेवतो, हा कटू अनुभव देखील मला बालपणी आला, असेही त्यांनी सांगितले. 

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पदावर असलेले प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन हे अतिशय वक्तशीर आहेत; तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते राज कपूर हे व्यक्तिगत जीवनात अतिशय नम्र होते. हल्लीच्या तरुणाईला चित्रपटाच्या भव्य पडद्यावरील नट-नट्या हे आपले आयडॉल वाटतात; परंतु डॉ. रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर हे खरेखुरे आदर्श असले पाहिजेत. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, सोनिया गांधी, पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सान्निध्यातील आठवणी, युद्धात जायबंदी होऊन अपंग झालेला पण अतिशय कणखर मनाचा देशभक्त कर्नल पंकज जोशी, हळव्या मनाची कलावंत सुहासिनी मुळगावकर, विचित्र सवयीची बेरकी माणसे यांची प्रत्ययकारी व्यक्तिचित्रे डॉ. मेहेंदळे यांनी आपल्या शैलीत साकारली. 

जुन्या काळातील संस्कृतीसंपन्न पुणे, पुणेरी पाट्या आणि पुणेरी माणसांचे इरसाल किस्से, आजच्या आणि पूर्वीच्या काळातील महाविद्यालयीन जीवनात झालेले भन्नाट बदल, पूर्वजांचे दुरभिमान आणि त्याच्या गमती, पंतप्रधान कार्यालयातील तसेच दिल्ली आकाशवाणीतील विनोदी किस्से सांगताना नकला, कविता, श्लोक, लोकगीते, अभिजात चित्रपटगीते, नाट्य स्वगत यांची रेलचेल करीत डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी रसिकांना खळाळून हसवले त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावत अंर्तमुख सुद्धा केले. 

कार्यक्रमाच्या संयोजनात संजय ढमढेरे, दत्ता पटवेकर, संपत बोत्रे, राजेंद्र हरेल, सचिन वाडकर, विनोद रामाणे, नीलेश मस्के, सचिन केदार, योगेश आदलिंगे, दौलत जाधव यांनी सहकार्य केले. अरविंद वाडकर यांनी सूत्रसंचालन केले. राहुल वाडकर यांनी आभार मानले. सामुहिक पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता झाली.