ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लातूरची तहान भागवणार 'पाणी एक्स्प्रेस'

लातूर, दि.६ (प्रतिनिधी) - भीषण पाणी संकटात सापडलेल्या लातूरची तहान भागवण्यासाठी मिरजेतून रेल्वेद्वारे वारणा धरणाचे पाणी दिले जाणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी पाहणी करुन तसा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांना दिला. या प्रस्तावाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अनुमती दिली असून लातूरकरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दर आठ ते दहा दिवसांतून एकदा २५ लाख लिटर पाणी पुरवठा होणार आहे.

मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणी देणे शक्य असल्याचा प्रस्ताव भाजपचे पदाधिकारी मकरंद देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. त्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी खडसे, पंकजा मुंडे, पाणीपुरवठा प्रधान सचिव राजेशकुमार, मदत व पुनर्वसन सचिव के.एच.गोविंदराज मंगळवारी मिरजेत आले होते. खडसेंनी रेल्वे, पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपलब्ध पाणीसाठा, जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता, रेल्वे वाघिणीत पाणी भरण्यासाठी आणि लातूरला पाणी पाठवण्यासाठी लागणारा वेळ याबाबत चर्चा केली.

मिरज- लातूर थेट रेल्वेमार्ग आहे. या मार्गावरून एकावेळी ५० वाघिणींद्वारे २५ लाख लिटर पाणी वाहून नेणे शक्य आहे. ३६६ किलो मीटर अंतर कापून दहा तासांत ही रेल्वे लातूरला पोहोचू शकते. या पर्यायाने पाणीपुरवठा केला तर लातूरला दर आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होऊ शकतो, असे या चर्चेतून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे कर्नाटकने वारणा धरणातून चार टीएमसी पाण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. लातूरला अन्य मार्गांनीही पाणीपुरवठा करण्याचा विचार झाला; पण कमी कालावधीत पाणी पाठवण्यासाठी मिरजेचा पर्यायच योग्य आहे. शिवाय वारणा धरणात ११ टीएमसी पाणी असल्याने पुढील सहा महिने पाणीपुरवठा होऊ शकतो. 
मिरजेच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताही चांगली असल्याने कोणतीही अडचण येणार नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही या पर्यायाला हिरवा कंदील दाखवला आहे. आजपासूनच पाणी पाठवण्यासाठीची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील दहा दिवसांत पहिली रेल्वे पाणी घेऊन लातूरला जाईल. त्यानंतर रेल्वेच्या उपलब्धतेनुसार पाणी पाठवण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले. सध्या मिरजेत रेल्वेची स्वतंत्र जलशुद्धीकरण यंत्रणा असली तरी नदीतून जल'शुद्धीकरण केंद्रापर्यंत अतिरिक्त पाणी आणण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकावी लागणार आहे. त्यासाठी काही कालावधी लागेल. त्यानंतर लातूरला नियमित पाणीपुरवठा होईल. वारणा धरणावर असलेल्या म्हैसाळ सिंचन योजनेवर मिरज, कवठे महांकाळ, जत तालुके अवलंबून. त्यांची गरज भागविल्यानंतरही पाणी शिल्लक राहते.