ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

धागेदोरे तरी मिळाले (अग्रलेख)

कॉम्रेड पानसरे यांची हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांना प्रथमच काही धागे हाती आले आहेत. विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी पोलिसांना हा माग लागला. गणेशाशी संबंध लावणे विवेकमार्गी पानसरे समर्थकांना पटणार नाही आणि न पटण्यासारखाच हा संबंध आहे. मात्र, गणेश हा विघ्नहर्ता मानला जातो व विचारांची हत्या शस्त्राने करणाऱ्यांचा सुगावा त्याच्या आगमनाच्या दिवशी लागावा ही बाब श्रद्धावान भाविक जनतेला सुखावणारी आहे. ही भाविक जनता हिंदू जीवनपद्धतीवर विश्वास ठेवणारी आहे. ती मूर्तिपूजक असली तरी भेकड हल्ल्यांचे समर्थन करणारी नाही. पानसरे यांचे विचार अनेकांना पटत नसले तरी त्याहून तीव्रपणे त्यांची हत्या पटली नाही हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. मात्र, पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी नेत्याला संपवण्याची मुळे हिंदू विचारपद्धतीत मुरलेली आहेत, या पुरोगामी श्रद्धेला गायकवाड या संशयिताने बळकटी दिली आहे.

धर्माच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना ठार करण्याची अन्य काही धर्मीयांतील पद्धती अलीकडे बोकाळलेल्या हिंदुत्ववादी विचारांत असल्याची टीका पुरोगामी करतात. त्यांचा रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सावरकरांवर असतो. सावरकरांनी उघडपणे शस्त्रसंपन्न होण्याचे आवाहन केले होते. संघाने तशी उघड भूमिका घेतलेली नाही. संघ कशातच उघड भूमिका घेत नाही व परिस्थितीनुसार आपल्या भूमिकेला रूप देतो. मात्र, संघ वा सावरकरवाद्यांची विचारनिष्ठा हीच हिंसक प्रतिक्रियेला जन्म देत आहे यावर पुरोगामी ठाम आहेत. यामुळे सध्या जरी सनातन संस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडली असली तरी हे धागेदोरे संघापर्यंत पोहोचवले गेल्याशिवाय पुरोगामी गटाचे समाधान होणार नाही. हे वास्तव लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संघटनांच्या सर्वोच्च नेत्यांनी सनातन संस्थेचा स्पष्ट शब्दात जाहीर निषेध केला पाहिजे तसेच याबाबत पोलिसांना सर्वोतोपरी सहकार्य केेले पाहिजे. तसेच पोलिसांना फार काळजीपूर्वक तपास करावा लागेल. दाभोलकर यांच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटनांबाबत माध्यमांतून बरेच काहूर उठले. सत्ताधारीही अशा संघटनांच्या विरोधात होते. तरीही पोलिसांनी अत्यंत संयमाने काम केले व बळकट पुराव्याशिवाय अटक करण्याची घाई केली नाही. हाच संयम पुढेही बाळगला पाहिजे. बलवान हिंदुत्ववादी संघटनांपर्यंत पानसरे-दाभोलकर खुनाचे धागे पोहोचले तर पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा बाळगू नये. मात्र, केवळ संशयापोटी कारवाई झाली तर जनतेमध्ये अविश्वास उत्पन्न होईल. मालेेगाव बॉम्बस्फोटाबाबत तसे झाले आहे. या स्फोटाला जबाबदार ठरवून अटक झालेल्यांवर अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाही. कित्येक वर्षे उलटली तरी आरोपपत्रच दाखल होत नसल्यामुळे कर्नल पुरोहित व अन्य जणांना उगाच डांबले आहे काय, अशी शंका जनतेच्या मनात येते. अशी शंका उत्पन्न होणे समाजहितासाठी घातक आहे हेे लक्षात घेऊन पोलिसांनी काम करावे. गायकवाडला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अतिशय मोजक्या शब्दांत व नि:संदिग्धपणे माहिती दिली व त्यामुळे माध्यमांना पतंग उडवता आले नाहीत. असाच संयम यापुढेही अपेक्षित आहे.
सनातन संस्थेनेही या प्रकाराचा गंभीर विचार केला पाहिजे. गायकवाडच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार संस्थेने प्रगट केला आहे. यात गैर काही नसले तरी याच प्रकारे विविध दहशतवाद्यांच्या पाठीशी त्यांचे समर्थक उभे राहतात तेव्हा त्यावर केली जाणारी टीका ही चुकीची असते हे कबूल करावे. कोणाही दहशतवाद्याला शिक्षा झाली की तो कसा निरपराध होता हे सांगणाऱ्या बातम्यांचा वृत्तपत्रांत पूर येतो. हाच प्रकार इथेही होत असेल तर ते चांगले लक्षण नव्हे. याहून महत्त्वाची बाब म्हणजे सनातन संस्थेच्या ध्येयधोरणात हिंसेला कोणते स्थान आहे हे स्पष्टपणे समाजाला समजणे अत्यावश्यक आहे. संशयाची सुई उगीच दिशा दाखवत नाही. काही तरी पाणी मुरत असतेच. हिंसक प्रतिक्रिया देण्याची प्रेरणा सनातनच्या कामातून मिळत असेल तर आपल्या कामाचा चालकांनी पुनर्विचार केला पाहिजे. कारण खऱ्या हिंदू विचारसरणीत हिंसा समर्थनीय नाही. संघर्षापेेक्षा सामावून घेण्यास या विचारसरणीत प्राधान्य आहे. अगदी गीतेमध्येही हिंसा मान्य केलेली नाही, मग गीता अर्धवट समजून घेणारे काहीही म्हणतो. हिंदू जीवनपद्धतीचा खरा अर्थ टिळक, गांधी, अरविंद व रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांत आहे. ते विचार या भूमीशी एकरूप झालेले आहेत, म्हणून चिरस्थायी वा सनातन आहेत. हे विचार कर्मकांडाला त्याज्य ठरवणारे, म्हणून पुरोगामीही आहेत. मोकळेपणे विचार करणाऱ्यांना हिंदू तत्त्वज्ञानाइतके पुरोगामी तत्त्वज्ञान कोठेही सापडणार नाही. रामकृष्ण परमहंस ते अरविंद यांच्यापर्यंत चालत आलेल्या हिंदू विचाराशी आपले नाते काय हे सनातन संस्थेने स्पष्ट केले पाहिजे. तसे नसेल तर सनातन ही संस्था खऱ्या अर्थाने हिंदू विचारांची म्हणता येणार नाही व भारतीय समाजही तिला आपली म्हणणार नाही.