ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कुटुंबियांच्या सहकार्याने घरासोबतच प्रभागातही लक्ष - स्वाती साने

प्रभाग क्र. ३ (अ) - चिखली 

ठळक कामं - 
0 प्रभागातील पाण्याचा प्रश्‍न टाकी उभारुन प्राधान्याने सोडवला.
0 रस्ते, सिमेंट ब्लॉक, अंतर्गत जलवाहिनी, विद्युतवाहिनीची सोय केली. 
0 हुशार, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली.
0 गरीब महिलांना शिलाई मशिनचं वाटप केलं.
0 प्रभागातील उघड्या गटारी बंद केल्या.
0 महापालिकेची शाळा सुरू केली. 
0 अद्ययावत हॉस्पिटलची उभारणी सुरू.

वर्षभरातील प्रस्तावित कामं -
0 डीपी रस्त्याची कामं पूर्ण करणार.
0 गायरान भागातील शेतकर्‍यांशी समन्वयानं तडजोड करणार.
0 संतपीठाची उभारणी करणार.
0 महिलांसाठीच्या योजना तळागाळात पोहोचवणार.
0 जलतरण तलावासाठी प्रयत्न करणार.

पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) - महिलांच्या कर्तृत्वाला आता आकाशही अपुरं पडू लागलं आहे. म्हणूनच सर्वच क्षेत्रात त्या हिरीरीने काम करताना दिसतात. चूल आणि मूल या पूर्वीच्या चाकोरीबद्ध आयुष्यातून त्या केव्हाच बाहेर आल्या आहेत. आता चूल, मूल तर आहेच, पण त्याचबरोबर करियरही त्या उत्तमरित्या सांभाळताना दिसत आहेत. अर्थातच हे काम तेवढं सोपं नाही. त्यासाठी त्या महिलेच्या कुटुंबियांचीही तेवढीच महत्त्वाची भूमिका ठरते. राजकारणासारख्या २४ तास सुरू असणार्‍या क्षेत्रात जर एखादी महिला काम करीत असेल तर तिच्या कुटुंबियांचं पाठबळ खूपच मोलाचं ठरतं. प्रभाग क्र. ३ (अ) च्या नगरसेविका स्वाती प्रमोद साने याही या गोष्टीला अपवाद नाहीत. त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून खूप सहकार्य मिळतं, म्हणूनच त्यांच्या मुलांची काळजी न करता आपल्या प्रभागरुपी कुटुंबातील लेकरा-बाळांची काळजी त्या उत्तमरित्या घेऊ शकतात!

केबी9 न्यूजवर आयोजित विकासकामांचा लेखाजोखा या मालिकेतील प्रभाग क्र. ३ (अ) च्या नगरसेविका स्वाती प्रमोद साने यांची मुलाखत झाली. मुलाखतीला येताना कोणताही लवाजमा सोबत न आणता त्या एकट्या आल्या हे पाहून सार्‍यांना सुखद आश्‍चर्याचा धक्का बसला. आपण मोठ्या घराण्यातील आहोत, अथवा नगरसेविका आहोत, असा कोणताही अभिनिवेश न बाळगता सहजपणे बोलणार्‍या स्वाती साने यांच्या एकूणच व्यक्तिमत्वातून साधी राहणी उच्च विचारसरणीचा प्रत्यय येत होता. स्वातीताईंना माहेर, सासर दोन्ही घराण्यात राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला. लहानपणापासूनच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना त्यातून वाढीला लागली. योगायोगाने विवाहानंतरही सासरी हीच भावना अनुभवायला मिळाली. त्यामुळे आपणही सामाजिक कार्य करावे, या उद्देशाने स्वातीताईंनी कामाला सुरूवात केली. राजकारणातून लोकोपयोगी कामं होऊ शकतात, हे समजल्यानंतर त्यांनी निवडणुकीला उभं राहण्याचं ठरवलं. सामाजिक कार्याचा अनुभव उपयोगी पडला आणि त्या निवडून आल्या. राजकारणात महिलांना खूप जपून काम करावं लागतं, हे सांगतानाच या क्षेत्रात येणार्‍या महिलांना आपल्या कुटुंबियांचा पाठिंबा असणं किती गरजेचं असतं, हेच त्यांनी अधोरेखित केलं. स्वातीताई एकत्र कुटुंबात राहतात. त्यामुळे त्यांची मुलं शाळेतून आली का, जेवली का, या प्रश्‍नांची चिंता त्या करीत नाहीत. त्या निर्धास्त असतात. कारण कुटुंबातील अन्य सदस्यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमामुळे त्यांची ही जबाबदारीही आनंदाने स्विकारलेली आहे. ही फार मोठी जमेची बाजू आहे. अर्थात घरात, बाहेर समन्वय साधताना थोडीफार कसरत होतेच,असं स्वातीताई म्हणतात.  

स्वातीताईंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री. शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार यांचे नेहमीच ऋण मानले आहेत. त्या म्हणतात, महिलांमधील ताकद याच नेत्यांनी उत्तमरित्या जाणली. त्यामुळेच 50 टक्के आरक्षण दिलंय. हे नेते वेळेबाबत खूपच काटेकोर आहेत. त्यांच्यातील हे गुण मी घेतले. त्यामुळे कोणताही कार्यक्रम असो, मी वेळेवर हजर होतेच. प्रभागातील विकासकामं करणं हे तर नगरसेवकांचं प्रथम कर्तव्यच आहे. पण या व्यतिरिक्त आपल्या प्रभागातील नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी सोडवणंही मी माझं कर्तव्य समजते. मला जितकं शक्य होईल, तितकी मदत मी प्रत्येकाला करतेच, असं त्या म्हणतात.

चिखली भागात समाविष्ट गावं आहेत. त्यामुळे बजेटची समस्या येते. गायरान भाग असल्यामुळे येथील शेतकर्‍यांशी खूप सामंजस्याने बोलावं लागतं. त्यांचं नुकसान न होता, प्रश्‍न सोडविण्यावर माझा भर आहे. प्रभागात पाण्याचा प्रश्‍न खूप गंभीर होता. त्यामुळे तातडीने तो प्रश्‍न हाती घेतला. पाण्याच्या टाकीचं भूमीपूजन अजितदादा पवारांंच्या हस्ते झालं. येत्या दोन महिन्यात या टाकीचं उद्घाटनही होईल. गेल्या चार वर्षात संपूर्ण प्रभाग अंडरग्राऊंड केलाय. सर्व भूमीगत वाहिन्या सुरू केल्या. ड्रेनेज, डांबरीकरण, डी.पी. रस्त्यांचं काम सुरू आहे. प्रभागातील शाळेचा मोठा प्रश्‍न होता. आता शाळेची ७ मजली इमारत उभी राहिली आहे. जून महिन्यापासून या शाळेत माझी प्रभागातील मुलं शिक्षण घेऊ शकतील. पाच एकर जागेत हॉस्पिटलची उभारणी आणि संतपीठाची उभारणी हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहेत. आम्ही दोघेही नगरसेवक त्यासाठी पूर्णत: प्रयत्न करत आहोत. प्रभागात जलतरण तलाव सुरू करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे.  नगरसेविका स्वाती साने यांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. त्या म्हणतात, माझ्या प्रभागात अजूनही काही ठिकाणी पूर्ण ग्रामीण वातावरण आहे. तिथे खांद्यावरचा पदर खांद्यावरच घ्यावा लागतो. अर्थातच, साधी राहणी उच्च विचारसरणी असलेल्या, ग्रामीण आणि शहरी दोन्ही वातावरणात सहज मिसळून जाऊन मनापासून काम करणार्‍या स्वातीताईंच्या विकासकामांबाबतच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, यात शंका नाही.