ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

जीवनदायी आरोग्य विमा योजना पत्रकारांना लागू करणार

>> मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा 

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) - राज्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना जीवनदायी आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल. या योजनेसाठी पत्रकारांना विशेष आरोग्यपत्र दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच येथे सांगितले. 

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, वार्ताहर संघाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली यांच्यासह सदस्य व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, पत्रकारांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचाही राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत कार्यवाही सुरु असून याबाबत पुढील महिन्यात निर्णय घेण्यात येईल. यासाठी विशेष कार्ड देखील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना दिले जाईल. पत्रकारांना मुंबईत घरे उपलब्ध करुन देण्याबाबत सिडको, म्हाडा यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. पत्रकारांना पेन्शन लागू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून त्याबाबतही कार्यवाही सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये पाच कोटी रुपयांचा निधी वाढवून देण्याची वार्ताहर संघाची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. ठाणे कासारवडवली येथे झालेल्या दुर्घटनेचे चित्रिकरण करताना मृत्यू झालेल्या वृत्तवाहिनीचे कॅमेरामन श्री. भौमीक यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीदेखील मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. 

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वार्ताहर संघाच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक शिवाजी मानकर यांनी प्रास्ताविक केले. 

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख, केतन पाठक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा. ना. मुसळे यांच्यासह वार्ताहर संघाचे उपाध्यक्ष प्रविण राऊत, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, खजिनदार महेश पवार, कार्यकारिणी सदस्य महेश पावसकर, विवेक भावसार, खंडूराज गायकवाड, राजू झनके उपस्थित होते.