ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

माथेरानची मिनिट्रेन सेवा चालू ठेवावी - खासदार श्रीरंग बारणे

मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) - मावळ लोकसभा मतदार संघामध्ये ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या माथेरान या पर्यटन स्थळी ब्रिटीश काळापासून असलेल्या व पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेन रेल्वे सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मिनिट्रेनची सेवा पूर्ववत चालू ठेवण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी काल संसदेत प्रश्न उपस्थित केला व रेल्वे मंत्री माननीय सुरेश प्रभू यांची प्रत्यक्ष भेट घेवून चर्चाही केली. 

यावेळी माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी व संपर्क प्रमुख प्रसाद सावंत, कैलाश चौधरी यांनीही माथेरान मिनीट्रेन सेवा पूर्वपदावर येण्यासंदर्भात रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिले.
 
नेरळ - माथेरान या मार्गावर ब्रिटिशांनी पुणे व मुंबई शहराच्या मध्यवर्ती असलेल्या माथेरानला त्यावेळी थंड हवेचे ठिकाण घोषित करून पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यात आला. सन १९०७ साली ही मिनिट्रेन सेवा ब्रिटीश काळापासून सुरू झाली असून आज या सेवेला ११० वर्षे पूर्ण झाली आहेत. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खऱ्या अर्थाने माथेरान हे प्रकाश झोतात आले आहे. एखादी अपवादात्मक घटना वगळता या मिनी ट्रेनची सेवा अखंड चालू आहे. परंतु मागील दोन वर्षापासुन या गाडीच्या सेवेला ग्रहण लागलेले आहे. अमन लॉज रेल्वे स्थानकाजवळील भागात एकाच आठवड्यात ही मिनीट्रेन दोन वेळा रुळावरून घसरल्यामुळे ही सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते. माथेरानचे प्रमुख आकर्षण ही छोटी टॉयट्रेन आहे. देश विदेशातुन पर्यटक खास करून याच सफरीत रममाण होण्यासाठी नियमितपणे येत असतात. मुंबईच्या लोकल प्रमाणेच माथेरान करांच्या उदरनिर्वाहाची ही लाईफ लाईन बनली आहे.
 
मागील अधिवेशनात खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत माथेरान मिनिट्रेनच्या इंजिन संदर्भात महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला होता. बारणे यांच्या मागणीनुसार यावर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकामध्ये या ट्रेनच्या इंजिनसाठी १५ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. जर ही गाडी बंद पडली तर स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सध्या शेवटचा पर्यटन हंगाम चालू असुन माथेरान करांची आर्थिक उलाढाल याच हंगामावर अवलंबुन आहे. या ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या ठिकाणातून मिळणारे उत्पन्न न पाहता पर्यटनाला कशा प्रकारे चालना मिळेल या दृष्टिकोनातूनही सरकारने याकडे पाहावे अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे व शिष्टमंडळाने केली.  
 
माथेरानच्या विकासाच्या दृष्टीकोनातून ही महत्वपुर्ण बाब असून सदरची मिनी ट्रेन पूर्ववत चालू ठेवावी असा मुद्दा खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत उपस्थित केला व त्याचबरोबर माननीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे महाराष्ट्रातील असून त्यांच्या कार्यकाळात माथेरान येथील मिनीट्रेन बंद पडण्याची घटना घडत असेल तर ती महाराष्ट्रासाठी निश्चितच दुर्भाग्याची गोष्ट असल्याचे  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.