ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

बदलापूरजवळ मानवनिर्मित फणसाचे जंगल

बदलापूर, दि. 20 (प्रतिनिधी)- चौथी मुंबई म्हणून विकसित होणार्‍या बदलापूर आणि त्याच्या आसपासचा परिसर म्हणजे झपाट्याने वाढणारे सिमेंटचे जंगल. संपूर्ण देशात या बदलापूरच्या लोकसंख्यावाढीचा दर हा प्रचंड आहे. बदलापूरचे प्रख्यात जांभूळ या सिमेंटच्या जंगलात अस्तित्वाची लढाई लढत आहे. अशा या वातावरणात बदलापूर पासून दहा कि. मी. च्या अंतरावर मानवनिर्मीत जंगल वाढले आहे. आणि विशेष म्हणजे या जंगलात फणसाची तब्ब्ल पाचशेच्यावर झाडे आहेत. दुसरे विशेष म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीच्या या वातावरणात चार भावंडांनी मिळून हे जंगल वाढवलेले आहे. देशमुख उद्यान असे या कृषी पर्यटन केंद्राची ही कहाणी आहे. 
वांगणी जवळ असलेल्या कारावं या उल्हास नदी किनारी हे देशमुख उद्यान विकसित झालेले आहे. बाबाजीराव देशमुख यांचे चिरंजीव गणपत बाबाजीराव, चंद्रकांत बाबाजीराव, रमेश बाबाजीराव, दिलीप बाबाजीराव आणि विलासराव गणपत देशमुख या देशमुख बांधवानी हे जंगल निर्माण केले आहे. आंबा, फणस, चिकू, लिंबू आदींची झाडे यांनी लावले असून कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत त्यांनी वापरलेले नाही. सेंद्रीय पद्धतीने या झाडांची निगा राखत आहेत. त्यांच्या पिकांची ही विश्वासार्हता सातत्याने वाढत असल्याने त्यांना त्यांचा माल विक्रीसाठी बाजारपेठेत जावे लागत नाही तर व्यापारी त्यांच्याकडे येतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. उल्हास नदीच्या एक बाजूला देशमुख बंधूनी निर्माण केलेले जंगल तर दुसरीकडे ओसाड माळरान पाहून देशमुख बंधू अस्वस्थ होत असतात. आसपासच्या ग्रामीण भागातील गरीब लोकांना व्यापारी बनवण्यासाठी या देशमुखांची धडपड असते. आदिवासी, कातकरी यांना ते माल देतात आणि विक्री झाल्यावर पैसे घेतात. त्यामुळे या गरीब नागरिकांना बिन भांडवली व्यवसाय करता येतो. त्याचप्रमाणे अशी कातकरी कुटुंबे त्यांनी आपल्या कृषी उद्यानात ठेवलेले आहेत. या कुटुंबाना केवळ नोकर म्हणून ते वागवीत नाहीत तर आपल्या घरातील असल्याप्रमाणेच आपुलकीची वागणूक देत असतात. इतकेच नव्हे तर त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च हे देशमुख कुटुंबीय आपलेपणाने करीत असतात त्यामुळे त्यांचे एकमेकांशी वेगळे नाते निर्माण झालेले आहे. 
पिवळ्या आणि पांढर्‍या रंगांच्या गर्‍याबरोबरच शेंदरी गरे असणारी नवी वैशिष्ट्यपूर्ण फणसाची जात येथील देशमुख बागेत विकसीत करण्यात आली असून चाफ्याच्या फुलासारख्या दिसणार्‍या या गर्‍यांना डोंबिवली, बदलापूर, कल्याण, कर्जत नेरळ परिसरातील बाजारपेठांमध्ये विशेष मागणी आहे. सर्वसाधारणपणे आंबा आणि फणस असे जोडीने म्हटले जात असले तरी या दोन्ही फळांच्या गुणधर्मात आणि वैशिष्ट्यांमध्ये खूप फरक आहे. 
आंब्याच्या तुलनेने फणस कितीतरी मोठा वजनदार, पुन्हा अंगावर काटेरी आवरण. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने फणस तापदायक ठरतो. एप्रिल ते जून या तीन महिन्यात आंब्याचे मार्केट असते. फणसही साधारण याचकाळात येत असले तरी त्याला भाव मात्र वटपौर्णिमेलाच असतो. एरवी फणस कुणी मुद्दामहून विकत आणून खात नाही. कोकणातून मुंबईकर चाकरमान्यांना भेट म्हणून फणसाचे एखादे फळ येते. मात्र गेली काही वर्षे डोंबिवली-बदलापूर पट्ट्यातील रहिवाशांना वांगणीजवळील काराव येथील फणस मिळू लागले आहेत. कारावच्या देशमुख उद्याानात ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी फणसाची बाग असून त्यात 500 हून अधिक झाडे आहेत. 
सध्या परिसरातील व्यापारी वटपौर्णिमेनिमित्त बागेत येऊन फणस घेऊन जात असल्याची माहिती दिलीप देशमुख यांनी दिली. शहराजवळच फणस उपलब्ध असल्याने वाहतूक खर्च कमी होऊन ग्राहकांना किफायतशीर दरात मिळतात. पांढरा आणि पिवळ्या रंगाप्रमाणेच शेंदरी रंगाचे गरे असणारे फळ हे देशमुख बागेचे वैशिष्ट्य आहे. फणसांची अधिक लागवड करून हे वैशिष्ट्य जपण्याचा मनोदय देशमुख बंधुंनी व्यक्त केला. 
फणसाबरोबरच चिकु, जांभळे, आंबे, लिंब देशमुख बागेत मिळतात. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेली देशमुख बाग कृषि पर्यटनाचा आदर्श नमुना आहे. अलीकडे सातबारा कोरा होण्याच्या वातावरणात शेती विकण्या ऐवजी पिकवण्यासाठी देशमुख बंधूंचा हा यशस्वी प्रयोग अन्य शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरणार आहे.  देशमुखांच्या या मेहनतीचा शासनाने गौरव केलेला आहे. चंद्रकांत देशमुख आणि रमेश देशमुख यांना कृषिभूषण पुरस्कार, दिलीप देशमुख यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार तर गणपतराव देशमुख यांना शासनाचा प्रगतिशील शेतकरी या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.