ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बाळा नांदगावकर समर्थंकाची राज ठाकरेंकडून उचलबांगडी

मुंबई, दि. २७ - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक फेरबदलाच्या बैठकांचे नियोजित वेळापत्रक पूर्ण होण्यापूर्वीच पक्षातील बड्या नेत्यांना झटके देण्यास सुरुवात केली असून त्यांनी सोमवारी भायखळा आणि शिवडी या विभागांच्या विभागाध्यक्षपदावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या समर्थकांची उचलबांगडी करत नव्या विभागाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. विशेष म्हणजे भायखळा विभागात तर नांदगावकरांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या संजय नाईक यांचीच वर्णी लावत राज यांनी नांदगावकर गटाला जोरदार झटका दिल्याचे बोलले जात आहे.

मनसेत सध्या गेल्या दोन तीन वर्षांतील सलगच्या पराभवानंतर संघटनात्मक पातळीवर फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून राज ठाकरे यांनी याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबईतील विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. दरम्यान, शिवडी आणि भायखळा विभागातील बैठकांमध्ये तर कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंसमोर स्थानिक स्तरावरील गटातटांचे गाऱ्हाणे मांडले होते. याची गंभीर दखल घेत यापुढे कुणाचाच गट नसेल अशा शब्दांत राज यांनी बदलाचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे या बैठकांपासून आपल्याला दूर ठेवल्यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

याबाबत मनसेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवडीतील बैठकीत कार्यकर्त्यांच्यातक्रार नाट्याचे पर्यवसान मनसेच्या दोन गटांतल्या तुफान हाणामारीत झाले. ही बाब जरी पक्षांतर्गत पातळीवरच दाबण्यात आली असली तरीही राज ठाकरेंनी या घटनेची गंभीर दखल घेत या विभागांमध्ये तातडीने फेरनियुक्त्या केल्या आहेत. बाळा नांदगावकर यांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या विजय लिपारे यांना भायखळा विभागाध्यक्षपदावरून हटवत त्यांच्या जागी संजय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर शिवडी विभागाध्यक्षपदावरून आणखी एक नांदगावकर समर्थक सचिन देसाई यांची उचलबांगडी करत नंदकुमार चिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंधेरी विभागात मनसेचे उपाध्यक्ष संदीप दळवी यांच्या समर्थकाला हटवून रोहन सावंत या सर्वसामान्य कार्यकर्त्याची विभागाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप दळवी हे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे मेहुणे असून ते मनसेतील एक बडे नेते समजले जातात.