ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डेक्कन क्वीन अडवणाऱ्या महिलांना रेल्वेने ठरवले ‘राष्ट्रद्रोही’

पुणे, दि. १३ - रेल्वे प्रशासनाने पुणे ते मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणारी डेक्कन क्वीन रेल्वे रोखून धरणाऱ्या तीन महिला प्रवाशांना ‘राष्ट्रद्रोही’ ठरवले आहे. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर १० जुलैला प्रवाशांनी डेक्कन क्वीन एक तास रोखून धरली होती. त्यानंतर कारवाईचा बडगा उगारत रेल्वे पोलिसांकडून तीन महिला प्रवाशांना अटक करुन त्यांना न्यायाधीशांसमोर हजर केले.

महिलांची न्यायालयाने जामिनावर मुक्तताही केली. पण रेल्वे प्रशासनाकडून त्यानंतर काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात रेल्वे रोखण्याचे हे कृत्य राष्ट्रद्रोही ठरवण्यात आले आहे. रेल्वे रोखणे म्हणजे राष्ट्रद्रोही कृत्य असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी. के. दादाभोय यांनी म्हटले आहे. या तीन महिलांची नावे सीमा सुरेश गाडगीळ, वर्षा रेले आणि फातीमा अन्सारी अशी असून, या तीनही महिला मुंबई महापालिकेत नोकरी करतात.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे रेल्वे रोखणाऱ्या इतर आंदोलक पुढाऱ्यांचाही शोध घेऊन कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. डेक्कन क्वीन पुण्यात फेब्रुवारी महिन्यापासून एक नंबर प्लॅटफॉर्मला उभी न करता पाच नंबर प्लॅटफॉर्मला उभी केली जाते. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. गर्दीत अनेकवेळा चेंगरा चेंगरीही होते. त्यामुळे डेक्कन क्वीन पुन्हा एक नंबर प्लॅटफॉर्मला उभी करण्याची मागणी प्रवाशांकडून होते आहे.

या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने १० जुलैला प्रवाशांनी साखळी खेचून डेक्कन क्वीन पुणे रेल्वे स्थानकावरच रोखून धरली. यामध्ये अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर सव्वा सात वाजता पुण्यातून निघणारी डेक्कन क्वीन सव्वा आठ वाजता मुंबईकडे मार्गस्थ झाली. मात्र, आता रेल्वे रोखण्याच्या या कृत्याला थेट राष्ट्रद्रोही ठरवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का असा सवाल प्रवाशी करत आहेत.