ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

देशातील मंदिरांचे अर्थकारण

(राजेंद्र आठवले)
देवस्थान व आजूबाजूच्या परिसराचा विकास झाल्यानंतर देवस्थानांकडील पडून असलेली अमाप संपत्ती देशाच्या विकासासाठी उपयोगी पडली पाहिजे. महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेकडो आत्महत्या होत आहेत. अशा वेळी देवस्थानांनी शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पाहिजे. 

सरकारचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध आहे. सरकार जलशिवाराच्या गोष्टी करत आहेत. पण पाऊस झाला तर जलशिवारात पाणी साठेल ना ? दरवर्षी पावसाच्या टक्केवारीत घट होत चालल्याचे निदर्शनास येत आहे. जलशिवारे तयार होतील. पुढच्या वर्षी चांगला पाऊस पडेल, मग जलशिवारे पाण्याने भरतील असा भाबडा विश्वास सरकारला आहे. पण आत्ता शेतकऱ्यांनी करायचे काय ? त्यांच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे हे किती शेतकऱ्यांना पुरे पडणार. 

जेव्हा २०११ मध्ये राज्य सरकारने शिर्डी साईबाबा देवस्थानच्या पैशांमधून शिर्डीत पायाभूत सुविधा करण्याचा घाट घातला तेव्हा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकांवर होते. त्या वेळी त्यांनी देवस्थानचा पैसे वापरण्यास कडाडून विरोध केला होता. साईबाबांच्या तिजोरीत जमा होणाऱ्या भक्‍तांच्या पैशावर सरकारचा डोळा आहे. शिर्डीत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या निमित्ताने भक्‍तांच्या पैशांवर अनिर्बंध सत्ता गाजविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे आता देवस्थानांनी शेतकऱ्यांना मदत करावी हे फडणवीस कोणत्या तोंडाने सांगू शकतील ?

देशातील मंदिरांचे अर्थकारण पाहिले तर सामान्य माणूस चक्रावून जाईल. देशातील प्रमुख मंदिरांकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती कोठारात धूळ खात पडली आहे. ते चलनात आणले गेले पाहिजे. भाविकांनी दान म्हणून केलेली संपत्ती ही त्यांच्या पडत्या काळात त्यांच्यासाठीच वापरली गेली पाहिजे.

शेकडो वर्षांपासून आपल्याकडे इतकी संपत्ती कुजत असताना आपण जगभर कर्जाची भीक मागत फिरत होतो. सोन्याचा कटोरा हाती घेऊन भीक मागण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. पद्मनाभसारख्या एका मंदिरात जागतिक बँकेलाही कर्ज देण्याइतपत संपत्ती नुसती पडून आहे. 

देशातील इतर बड्या देवस्थानांमध्येही अशीच प्रचंड संपत्ती आहे. या देशात देवाच्या, धर्माच्या अगदी बुवा-बाबाच्या नावावरदेखील प्रचंड पैसा गोळा होऊ शकतो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. सत्यसाईबाबांच्या यजुर मंदिरात प्रचंड संपत्ती सापडल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. सत्य साईबाबांची एकूण संपत्ती किती आहे याचा हिशेब अजूनही लागलेला नाही. त्यांच्या खासगी कक्षात करोडो रूपये रोख स्वरूपात आढळून आले होते. 

इतरही अनेक धार्मिक-अध्यात्मिक बुवा-बाबांकडे अशीच कोट्यावधीची संपत्ती आहे. आपल्याकडचे आसाराम बापू, सुधांशु महाराज वगैरेंसारखे अनेक महाराज “फाईव्ह स्टार” जीवन जगताना दिसतात. एकेका प्रवचनासाठी लाखोंची देणगी हे महाराज मागत असतात आणि वर्ष-वर्ष त्यांच्या तारखा मिळत नाहीत, यावरून त्यांची एकूण आवक स्पष्ट व्हावी. 

आपल्याकडे सध्या विदेशातील काळा पैसा देशात आणण्याचा मुद्दा जोरात आहे. तो पैसा येईल तेव्हा येईल, किंवा कदाचित येणारही नाही; परंतु सध्या आपल्याकडील मंदिरात कुजत पडलेल्या ह्या अमाप संपत्तीचा विनियोग तरी व्हायला नको का? एकीकडे दोन-पाच हजाराच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि दुसरीकडे केवळ एका मंदिरात लाखो कोटींचा खजिना कुलूपबंद अवस्थेत पडला आहे, हे चित्र किती दुर्दैवी म्हणायला हवे. 

पुढे दिलेल्या देवस्थानांची संपत्ती पाहा म्हणजे काय ते लक्षात येईल. देशातील तिरुमला तिरुपती, काशि विश्वनाथ मंदिर, सिद्धीविनायक मंदिर, शिर्डी साई बाबा देवस्थान या चार प्रमुख मंदिरांची एकूण संपत्ती आहे १.३२ लाख कोटी रुपये. या मंदिरांमध्ये पाच लाख भाविकांकडून दररोज ८ कोटी रुपये दान स्वरूपात जमा होते. वर्षाकाठी चारही मंदिरात मिळून २ हजार ६९२ कोटी रुपये जमा होतात. तर चारही मंदिरावर खर्च होतो फक्त ४० कोटी रुपये. 

तिरुमला तिरुपती देवस्थान, आंध्र प्रदेश
एकूण संपत्ती १.३० लाख रुपयांपेक्षा अधिक. आंध्र प्रदेश राज्य सरकारचे वार्षिक बजेटसुद्धा एवढे नसेल. देवस्थानची एका वर्षांची कमाई दोन हजार २२२ कोटी रुपये आहे. तर मंदिरावर खर्च होतो फक्त ३२ कोटी रुपये.

काशि विश्वनाथ मंदिर, वाराणसी (उत्तर प्रदेश)
मंदिराची एकूण संपत्ती आहे ७१.३४ कोटी रुपये. दरवर्षी जमा होतात ११.५८ कोटी रुपये. तर खर्च होतात २,२६ लाख रुपये.

सिद्धी विनायक मंदिर, मुंबई
एकूण संपत्ती ३०६ कोटी रुपये. दरवर्षी मंदिरात जमा होतात ७०.२८ कोटी रुपये. वर्षाकाठी खर्च होतो फक्त ५३ लाख रुपये

साईबाबा मंदिर, शिर्डी
एकूण संपत्ती १ हजार ६२८ कोटी रुपये. एका वर्षाची कमाई आहे ३४७.२७ कोटी रुपये. खर्च होतात फक्त ८ कोटी रुपये.