ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शाही विवाह सोहळ्यांची खरच गरज आहे का?

श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहूल जगताप हे सामूदायिक विवाहसोहळ्यात विवाहबंधनात अडकले. त्यांच्याबरोबर अन्य नऊ जोडपीदेखील या सोहळ्यात विवाहबद्ध झाली. नेते मंडळींच्या उपस्थितीत झालेला हा विवाहसोहळा अन्य नेते, आमदार यांनी धडा घ्यावा असाच ठरला. समाजभानाची जाण ठेऊन केलेले हे कार्य अनुकरणीय आहे. 

काही दिवसांपूर्वी झालेल्या रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या शाही विवाहसोहळ्याची या निमित्ताने आठवण झाली. कोटींच्या घरात साजरा झालेला हा शाही विवाहसोहळा चांगलाच चर्चिला गेला. पण खरच अशा शाही विवाह सोहळ्याची गरज होती का? पार्टी विथ डिफ्रंट म्हणणाऱ्या  भाजप नेत्यांनी या सगळ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. संपत्तीचे प्रदर्शन, सत्तेचा माज यातून हे विकृत वर्तन घडत असावे. आमच्याकडचे लग्न सगळ्यांच्या लक्षात राहिले पाहिजे, या विचारानेच अशी उधळपट्टी केली जाते. 

सर्वसामान्य लोकही आता लग्नात अवास्तव खर्च करणे टाळू लागले आहेत. विशेषतः तरुणांमध्ये असा विचार रुजणे खरेच कौतुकास्पद आहे.  नोंदणी पद्धतीने विवाह करून आपल्या लग्नाचा खर्च समाजसेवी संघटना, अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना दिला जात आहे. अनेक तरूण-तरूणी असा विचार करू लागले आहेत. असाच एक आणखी सुंदर अनुभव म्हणजे काही महिन्यांपूर्वी एका वधूपित्याने लग्नाचा खर्च टाळून अनेक बेघर लोकांना स्वत:च्या हक्काच्या घरात राहण्यासाठी घरे बांधून दिली. मारवाडी समाजात खूप खर्च करून लग्न लावले जाते. पण या वधूने आपण लग्न साध्या पद्धतीने करूया व येणारा खर्च गरिबांसाठी खर्च करूया असे सांगितले. या प्रस्तावाला तिच्या पित्याने, कुटुंबाने आनंदाने होकार दिला. तसेच त्या मुलीच्या सासरच्या कुटुंबानेदेखील ही कल्पना खूप छान असल्याने होकार दिला. कुटुंबाच्या कल्पनेतून आलेली ही सूचना सर्वांनाच आवडते आहे. संपत्ती असणे चुकीचे नाही तर तिचा लोभ धरून विनियोग न करणे चुकीचे आहे. कोणताही गाजावाजा न करता हे काम पूर्ण झाले व त्या घरांमध्ये राहून आनंदी झालेले चेहरे पाहताना या कुटुंबाला कोण आनंद झालेला दिसत होता.

आश्चर्याची बाब म्हणजे या घरांमध्ये राहणार्‍या या लोकांना घर कोणी दिले हे देखिल माहित नव्हते. म्हणजे प्रसिद्धीचा मोह सोडून दिलेल्या या कुटुंबाचे कार्य खरच अनुकरण करावे असेच आहे. माझी संपत्ती मी खर्च केली तर कुठे बिघडले, तुम्हाला काय उधळपट्टी केली तर, असे प्रश्न अनेकांना पडत असतील. बरोबर, संपत्ती तुमची आहे. समाजात राहताना आपले नव्हे प्रत्येकाचे समाजाप्रती काही कर्तव्य असतात. ती कर्तव्ये आपण विसरत आहोत, असेच दिसते. 

सुरक्षित घरात राहताना आपण, आज अनेक कुटुंब रस्त्यांवर रहातात हे विसरतो आहोत. ऊन, वारा, पाऊस यांना तोंड देत ते कसे जगत असतील हे विचार करण्याचेही भान ठेवत नाहीत. कोटींच्या घरात केली जाणारी ही उधळपट्टी जर अशा वंचितांच्या उपयोगाला आली तर अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा जर पूर्ण करता आल्या तर, असा विचार या नेत्यांनी केला पाहिजे.