ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून प्रत्येक गाव टंचाईमुक्त करु - मुख्यमंत्री

नागपूर, दि. ९ (प्रतिनिधी) - माझ्या गावात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब माझ्या मालकीचा आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडवून माझ्या गावचे शिवार जलयुक्त करण्याचा संकल्प प्रत्येकाने करण्याचे आवाहन करतानाच उद्योग समूह, स्वयंसेवी संस्थानी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जलयुक्त शिवार अभियानासाठी पुढाकार घेऊन राज्यातील प्रत्येक गाव टंचाईमुक्त करण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिंगणा तालुक्यातील मौजा अंबाझरी येथील ३६ किलोमीटर नाला खोलीकरण व रुंदीकरण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, हवामानातील बदलामुळे पावसाचे दिवस कमी होत असून, पावसाचा खंड पडत असल्याने शेतीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. राज्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून २० हजार गावे टंचाईमुक्त करण्यासोबतच प्रत्येक गावातील पाण्याचा ताळेबंद ठेवून उपलब्ध पाणी व आवश्यक असलेले पाणी गावाच्या शिवारातच पाणलोट विकासाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी वैज्ञानिक दृष्टीने माथा ते पायथा या प्रणालीनुसार जास्तीत जास्त पाणी अडविण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून २४ टीमसी पाणी उपलब्ध झाले असून, यावर केवळ १ हजार ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. यापैकी ३०० कोटी रुपये लोक सहभागातून उपलब्ध झाले आहेत. यात राज्यातील सामाजिक संस्था, उद्योग समूह व सामान्य जनतेचाही सहभाग आहे. पाणी आहे तेथे समृद्धी आहे. पाण्याचा संबंध समृद्धीशी असल्यामुळे प्रत्येक गावात जलसमृद्धी पोहोचविण्यासोबतच विजेचे कनेक्शनही तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या योजनेअंतर्गत मागास भागातील ५८ हजार कृषीपंपांना वीज जोडणी दिल्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आर्ट ऑफ लिव्हिंग या स्वयंसेवी संस्थेने वैज्ञानिक पद्धतीने जलसंधारणाच्या कामात सहकार्य केले असून परसिस्टंट या उद्योग समूहानेही जलयुक्त शिवार अभियानासाठी पुढाकार घेऊन प्रशासनातील सर्व विभाग एकत्र येऊन काम करीत असल्यामुळे राज्य टंचाईमुक्त करण्यासाठी सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळ हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्यामुळे निर्सगाने दिलेले नदी नाले समृद्ध करुन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करुया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

श्री. बावनकुळे म्हणाले की, सोलर कृषीपंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १२ तास अखंडीत वीजपुरवठा देण्याच्या धोरणानुसार संपूर्ण फिडर सोलरवर रुपांतरीत करून जुने पंप बदलवून कमी ऊर्जा खर्च करणारे पंप दिले. तसेच शेतकऱ्याने अर्ज करताच एक महिन्यात विजेची जोडणी दिली. या उपक्रमासोबतच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्याची बांधणी करणारा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी लोकसहभाग वाढविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

या वेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अनुदानाचे वाटप करण्यात आले.