ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले १० हजार कोटींचे पॅकेज फसवे

नागपूर, दि. १७ (प्रतिनिधी) - शेततळी, विहिरी, शेती व्यवसायाशी निगडित कामे यांच्यावर खर्च करण्याच्या योजनांचे १० हजार ५१२ कोटी रुपयांचे पॅकेज त्यांनी जाहीर केले. त्यातील एकही पैसा थेट शेतक-यांना मिळणार नसल्याने विधान भवनाकडे डोळे लावून बसलेल्या शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. सरकारच्या या फसव्या घोषणेचा निषेध करीत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.

या निधीचे विवरण सांगत असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दुष्काळाने बाधित झालेल्या १५ हजार ७४७ गावांमधील ५३ लाख १९ हजार शेतक-यांना निविष्ठा स्वरूपात मदत मिळेल. (निविष्ठा स्वरूपात म्हणजे शेतीसाठी लागणा-या वस्तूंसाठी मिळेल. त्यात खते, शेती अवजारे, बियाणे यांचा समावेश) या वर्षात पेरण्याच झालेल्या नसल्याने अनेक शेतक-यांना एक पैशाचेही उत्पन्न झालेले नाही अशा शेतक-यांना थेट कोणत्याही मदतीचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही.

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या विषयावर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या वतीने नियम २९३ अन्वये चर्चा उपस्थित करण्यात आली होती. गेली तीन दिवस या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वातासाचे उत्तर दिले. त्यात त्यांनी गेल्या वर्षी केलेल्या विविध घोषणांचीच माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारचा शेतकरीद्रोही भूमिकेवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे केवळ स्वप्नरंजन आहे. या वर्षी शेतक-याला कोणतेही उत्पन्न झालेले नाही. त्यांना अधार देण्याची गरज होती, मात्र भविष्यात काय करणार आहोत, असे सांगून या सरकारने लोकांची दिशाभूल केली आहे, असे विखे-पाटील म्हणाले.

शेठजी-भटजींचे सरकार – अजित पवार
दुष्काळात होरपळणारा शेतकरी विधानभवनाकडे डोळे लावून बसला होता. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत, आपल्या पदरात काही तरी टाकतील अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र या सरकारने त्यांची पूर्ण निराशा केली आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे नाही तर शेठजी आणि भठजींचे आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी केला.

एकीकडे दुष्काळ आहे, दुसरीकडे जे पीक आले आहे, त्याला भाव नाही. या वर्षी संत्र्याला भाव नाही, केळीला भाव नाही. शेतकरी उध्वस्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे सरकार सर्वसामान्यांचा विचार करणारे नाही, तर मूठभर लोकांसाठी चालणारे सरकार आहे, असेही अजित पवार म्हणाले.