ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

वंचित समाजापर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा - मुख्यमंत्री

नागपूर, दि. २५ (प्रतिनिधी) - वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्‍यांनी गोरगरिबांची सेवा करावयाची आहे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सेवा करावी. या क्षेत्रातील नवोदित डॉक्टरांनी ग्रामीण भागात जाऊन काम करावे व समाधान मिळवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

एन.के.पी. साळवे वैद्यकीय संस्था आणि संशोधन केंद्र आणि लता मंगेशकर रूग्णालयाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते एन.के.पी.साळवे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 

मातोश्री सभागृहात आयोजित कार्यक्रमास अर्थ व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, कृष्णा विद्यापीठाचे कुलपती वेदप्रकाश मिश्रा, संस्थेचे अध्यक्ष रणजित देशमुख, संस्थेचे कोषाध्यक्ष तथा आमदार आशीष देशमुख, सचिव अमोल देशमुख, आमदार समीर मेघे, आमदार मिलिंद माने, भाऊसाहेब भोगे, गोपाळ दुबे आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आरोग्य सेवा आणि सुविधा पुरविण्याचे कार्य राज्य शासनातर्फे करण्यात येते. परंतु सेवेच्या काही कमतरता भासतात. शेतकऱ्‍यांच्या आत्महत्यांच्या विविध कारणांपैकी ग्रामीण भागातील आरोग्य सेवाही एक महत्त्वाचा भाग आहे. आरोग्य सेवेची उत्तम व्यवस्था उभारण्यासाठी सार्वजनिक आणि भागीदारीतून रूग्णालये उभारण्यात यायला हवीत. वैद्यकीय महाविद्यालयांचा विचार करताना राज्यातील सर्व जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. 

सैनिकी दवाखान्यांमध्ये किमान सात वर्षे सेवा करावी लागते. त्याचप्रकारे शासन सांगेल त्या ठिकाणी डॉक्टरांनी सात वर्षे सेवा बजावावी, याबाबतही विचार करता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

उच्च विद्याविभूषित असलेले एमबीबीएस पदवी प्राप्त डॉक्टर्स ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी उत्सुक नसतात. त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात मातृभूमीची सेवा, आराधना करताना ध्येयवाद आणि प्रेरणेने ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, राज्यात मेडिकल, पॅरामेडिकल कॉलेज उघडले जावेत. डॉक्टर हा समाजातील महत्त्वाचा असा घटक असून त्यांनी ग्रामीण भागाची सेवा करावी. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून बाहेर पडणाऱ्‍या प्रत्येक तरूणाने ग्रामीण भागात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अभियंता रस्त्याचे काम करतो. त्याचे मुल्यांकन चुकले तर रस्ता, उड्डाणपुलाचे नुकसान होते. मात्र डॉक्टर मनुष्याच्या जीवनाचे मुल्यांकन करत असतो. पृथ्वीपेक्षाही मानवाची किंमत अधिक आहे. त्यामुळे वैद्यकीय ज्ञानाची इमारत गरीब, अनाथ व श्रीमंताच्याही शरीरावर कार्य करून त्यांचे जीवन वाचवते. त्यामुळे या महत्त्वपूर्ण अशा ज्ञानाच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत आरोग्य सेवा देण्याचा संकल्प आज सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले.

प्रारंभी एन.के.पी. साळवे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच संस्थेचा माहितीपट यावेळी दाखविण्यात आला. संस्थेच्या २५ वर्षाच्या वाटचालीसंदर्भातील सोव्हेनिअरचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेत कार्य करणाऱ्‍या अधिकारी, कर्मचाऱ्‍यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात रणजित देशमुख यांनी विचार मांडले. प्रास्ताविक काजल मित्रा यांनी केले. तर, सूत्रसंचालन डॉ. निलोफर मुजावर, डॉ.राखी आंबाडे यांनी केले.