ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धा घेणार - मुख्यमंत्री

नागपूर, दि. १५ (प्रतिनिधी) - आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजतच क्रीडागुण असतात. केवळ त्यांना संधी देण्याची गरज आहे. धनुर्विद्येसारख्या खेळांमध्ये ते पारंगत असतात. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करुन त्यांना आपण एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. आदिवासी खेळाडूंच्या कलागुणांना अधिक वाव मिळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रात होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. अमरावती रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रविनगर येथील क्रीडा परिसरात आयोजित या स्पर्धा उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूंवर सांघिक संस्कार होत असतात. खिलाडू वृत्ती निर्माण होते. त्याचा जीवनात चांगला उपयोग होतो. आदिवासी खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळण्यासाठी नाशिक येथे आदिवासी विभागातर्फे क्रीडा प्रबोधिनी सुरु झाल्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. सोबतच या स्पर्धासुद्धा सुरु ठेवाव्या. त्यामुळे खेळाडूंमध्ये जिद्द निर्माण होईल. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जल-जंगल-जमिनीचे खऱ्या अर्थाने संरक्षण आदिवासी समाज करीत आहे. या माध्यमातून समाजाने आपल्या संस्कृतीची जपणूक केली आहे. पर्यावरणाचे खऱ्या अर्थाने संरक्षण आदिवासींनी केले आहे व करीत आहे. आता आधुनिक जगाचे मूल्य व आपल्या संस्कृतीची सांगड घालून आदिवासी युवकांनी आपला विकास साधण्याची खरी गरज आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आदिवासी विभागातर्फे विद्यार्थ्यांना आश्रम शाळांमधून पौष्टिक अन्न देण्याची योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी घेतल्यानंतर गुणात्मक बदल दिसून आले. सुदृढ आरोग्यासोबतच बौद्धिक वाढही झालेली आहे.

आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेला क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची मान्यता नव्हती. आता या स्पर्धांना राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना 25 क्रीडा गुण आणि पदक प्राप्त खेळाडूंना नोकरी आरक्षणाचा सवलतीचा लाभ मिळणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.                                                             

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात या क्रीडा स्पर्धेत १७०० विद्यार्थी भाग घेत आहेत. तब्बल ४ वर्षानंतर या राज्यस्तरीय स्पर्धा राज्यात होत आहेत. आदिवासी विभागाने अनेक नवीन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पालघर सारख्या भागात स्वच्छ एकिकृत किचन सुरु करुन विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळेल याची काळजी घेतली आहे. असे सांगितले.

आदिवासी विकास मंत्री विष्णूजी सवरा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नाशिक येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रबोधिनीतून कविता राऊत, किसन तडवी यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू निश्चितपणे निर्माण होतील. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. यावर्षी आश्रम शाळांमध्ये २२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली.

आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी आपल्याय प्रास्ताविक भाषणात २०११ नंतर राज्यात प्रथमच क्रीडा स्पर्धा होत आहे. यानंतर दरवर्षी निरंतर स्पर्धा आयोजित करण्यात येतील. नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीत ८७ आदिवासी खेळाडूंना यावर्षी प्रवेश देण्यात आला आहे. १२५ मुलांची प्रवेश संख्या आहे. या प्रबोधिनीतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू निश्चिपणे तयार करण्यात येतील. आश्रम शाळांमध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंची मानवंदना स्वीकारली. मशाल पेटवून उपस्थित खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा ध्वज व फुगे उडवून उद्घाटन झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यावेळी आदिवासी मुलांनी नृत्य सादर केले. व्यासपीठावर तुकडोजी महाराज, ज्योतिबा फुले, बीर्सा मुंडा, राणी दुर्गावती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण केले.

घोडगाव येथील कु. किरण संतोष तितकारे या मुलीने अस्खलीत इंग्रजीत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सुरेखा रामेश्वर अर्करा या मुलीनेसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त केलेल्या सुरेखाअर्करा, निलेश चौधरी, रोहिणी कोंकणी, वनराज जाधव, चंदू सावरे, रोहन वळवी, विशाल देथेकर, फुलावर, मिलिंद लहानगे, ज्योत्स्ना सुतार, योगेश चौधरी यांचा सत्कार केला.  तसेच आदिवासी समजाच्या शिक्षणासाठी असलेल्या विविध आश्रम शाळा याविषयी माहिती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री क्रमांक 18002670007 या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांनी स्वत: दूरध्वनी करुन शुभारंभ केला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, आमदार पंकज भोयर, माजी महापौर माया इवनाते, विभागीय आयुक्त अनूप कुमार, आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, राज्याचे अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांनी आभार मानले.