ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

अनुकंपा धारकांच्या वारसांना 10 लाखाचे विमा संरक्षण

अमरावती,दि. 19 (प्रतिनिधी) - : राज्यातील 80 टक्के सर्वसामान्य जनता ही एस. टी. बसने प्रवास करते. प्रवाशांना आराम दायक व सुरक्षीत प्रवास करता यावा यासाठी सर्व सोयी-सुविधायुक्त बसस्थानकांच्या निर्मितीसोबतच परिवहन विभाग अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती विभागाद्वारे उभारण्यात आलेल्या शहरातील राजापेठ बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण रावते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालकमंत्री प्रविण पोटे, महापौर चरणजीत कौर-नंदा, आमदार डॉ. सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, रवी राणा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, एस.टी. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मधुकर पठारे, विभाग नियंत्रक राजेश अडोकार, विभागीय वाहतुक अधिकारी श्री. सिया, आगार क्र.1 चे व्यवस्थापक मनोहर धजेकर आदी उपस्थित होते.

रावते म्हणाले की, विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी आवश्यक ती तरतूद शासनाद्वारे करण्यात येईल. सन 2004 साली राजापेठ बसस्थानकाचे भुमीपूजन आमदार डॉ. सुनील देशमुख यांचे हस्ते करण्यात आले होते. वास्तुशिल्पकार आशुतोष शेवाळकर यांच्या परिश्रमातून राजापेठ बसस्थानकाची सुंदर अशी इमारत उभी झाली आहे. स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक प्रकल्प गतीने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावेत. कुठल्याही स्थितीत बीओटी तत्वावर एस.टी. महामंडळाची जागा व्यावसायिक वापरासाठी देण्यात येणार नाही. 

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अधिक गतिमान व सक्षम करण्यासाठी शासनाने भांडवली खर्च म्हणून सुमारे 125 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या पैशाच्या माध्यमातून एस. टी. विभागाचा महत्त्वाच्या मुलभूत बाबींसाठी उपयोग करुन कायापालट करण्यात येणार आहे. एस.टी. बसने प्रवास करताना अपघात झाल्यास शासनाकडून प्रवाशास तात्काळ मदत म्हणून 10 लाखाचा विमा देण्यात येणार आहे. तसेच चालक - वाहकांचा अपघात झाल्यास त्यांचा वारसांना 10 लाख रुपयाचा विमा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, असेही श्री रावते यांनी यावेळी सांगितले.

परिवहन विभागाच्या नियोजित कामासाठी व नुतणीकरणासाठी 91 निविदा प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 34 निविदा ह्या बांधकाम करण्यासाठीच्या आहेत, अशी माहिती श्री. रावते यांनी दिली. एस. टी. महामंडळाचे काम तत्परतेने व नियोजनबद्ध व्हावे यासाठी राज्यस्तरावर उपमहाव्यवस्थापक पद निर्माण करण्यात आले असून कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विदर्भातील बसस्थानकांच्या बांधकामसंबंधी कामात सुसुत्रता येण्यासाठी चार वास्तुशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. एस.टी. विभागात अधिक गतिमान व पारदर्शकपणे कामे होण्यासाठी आगामी काळात महाराष्ट्रामध्ये नव्याने भरती करण्यात आलेले सुमारे 231 नवीन अधिकारी आपली कामगिरी बजाविणार आहे. 


परिवहन विभागाद्वारे चालकाची आरोग्य तपासणी करण्यात येत होती. आता विभागाच्या नवीन धोरणानुसार वाहकाची सुध्दा नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. येत्या काळात महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुलांचा उच्च शिक्षणाचा खर्च महामंडळ उचलणार आहे. महिला वाहक कर्मचाऱ्यांसाठी नवीन योजना कार्यन्वित करण्यात येणार आहे. एस.टी महामंडळ कर्मचारी व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या हितकारक संकल्पना माझ्यापर्यंत आणाव्यात. राज्यातील सर्व बस स्थानकातील प्रसाधनगृहाची स्वच्छता कायमस्वरुपी चांगली राहणार यासाठी उपाययोजना करण्यात येईल.

पालकमंत्री पोटे म्हणाले की, परिवहन विभागाच्या ज्या चालक-वाहक कर्मचाऱ्यांनी किरकोळ अपहार केला अशा सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मंत्री महोदयांनी घेतला. यामुळे त्यांच्या कुटूंबांना फार मोठा धीर मिळाला आहे. एस. टी. विभागाने ग्रामीण भागातील गोर-गरीब व मजुरांच्या मुलांना शहरातील शाळा – महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणे सोईचे व्हावे यासाठी 30 आसनी मिनी बस सुरु कराव्यात तसेच सर्वसामांन्यांना परवडणार अशी बससेवा परिवहन विभागाद्वारे पुरविण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. 

यावेळी आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार रवी राणा यांची सुध्दा मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक व्यवस्थापक मधुकर पठारे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती तोटेवार यांनी तर विभाग नियंत्रक राजेश अडोकार यांनी आभार मानले.