ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाऊस घेऊन बाप्पा आले, विदर्भ, मराठवाड्यात वरुणराजाचे पुनरागमन

नागपूर- विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहूतांश व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गुरुवारी गणरायाच्या स्वागताला पावसाने हजेरी लावली. विदर्भात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही कायम होता. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया तसेच गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाने दमदार पुनरागमन केले.

गणेशोत्सवाची सुरुवात पावसाने होणार असल्याचे अंदाज खरे ठरले. पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया तसेच गडचिरोली जिल्ह्यांत बुधवारी सायंकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. नागपुरात गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळी दमदार एन्ट्रीनंतर पावसाने काही काळ खंड दिला. मात्र, दुपारनंतर पुन्हा सुरुवात झाली. सायंकाळी पावसाने काहीकाळ विश्रांती दिल्याने गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकांवर फारसा परिणाम जाणवला नाही. सायंकाळी पावसाने काहीकाळ उसंत दिल्याने गणेश मंडळांनी वाजत गाजत गणरायाच्या आगमनाचा जल्लोष साजरा केला. ढोल ताशाच्या निनादात शहरातील रस्ते मिरवणुकांनी फुलून गेले होते. नागपुरात बुधवारपासून सुमारे ६० मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. मुसळधार पावसाने प्रामुख्याने भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चित्र निर्माण झाले आहे. भंडारा जिल्ह्यात लाखनी (१३० मि.मी), साकोली (९०मि.मी), लाखांदूर व पवनी (६० ते ६५ मि.मी.) जोरदार पावसाची नोंद झाली. दोन्ही जिल्ह्यांत ग्रामीण भागात घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्यातही बुधवारी रात्रीपासून पाऊस कोसळत असल्याने आरमोरी तालुक्यात पूरसदृश परिस्थिती आहे. बैरागड येथील वैलोचना नदीला पूर आला असल्याने त्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील शंभरावर गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ तसेच वाशीम जिल्ह्यांतही जोरदार पाऊस बरसला. अकोला जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २५ मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यातील औरंगाबादसह अन्य काही जिल्ह्यांमध्येही रात्री उशिरा दमदार पावसाने हजेरी लावली. सांगली, सातारा जिल्ह्यातही पावसामुळे दिलासा मिळाला.